Agriculture News : बियाणे, खते, कीटकनाशकांची तक्रार व्हॉट्सअप वरून करता येणार, धनंजय मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय

Agriculture News : राज्यात अनेक ठिकाणी यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांची सतत बोगस बियाणे, खते, कीटकनाशक विकून फसवणूक केली जाते. त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका सहन करावा लागतो.

विक्रेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीची तक्रार कोठे करावी असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. आता याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार आहे. राज्य सरकारद्वारे यासंदर्भात तक्रार करण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक जारी केला जाणार आहे. संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना मेसेज पाठवण्यात येईल. संबंधित पथक तपासणी करून विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकतीच कृषी विभागाची एक बैठक घेतली होती.

त्यात त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप क्रमांक सुरु करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे आदेश दिले आहेत. तसेच बियाण्यांच्या तक्रारींबाबत ओडिशाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांच्या नावाची गोपनीयता ठेवली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Agriculture News)

त्यांनी कापूस बियाण्यांच्या बाबतीत आढावा घेतला. बोलताना ते म्हणाले की, “राज्यात कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री केली जात आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार केलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले आहेत.