Beed News : मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच आहे मात्र किडींमुळे देखील पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागच्या वर्षी प्रमाणे परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज या भागांमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याने शेतकरी संकटात आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकसानीची पाहणी करत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी कृषी मंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधला त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोगलगाय नष्ट करण्याच्या विविध औषध आणि उपाययोजनांची माहिती देखील घेतली.
दरम्यान, बीड जिल्ह्यात पाऊस कमी पडल्यामुळे या ठिकाणी पेरण्या देखील उशिरा झाल्या आहेत. या ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर ही पिके हातभर देखील उगवली नाहीत. मात्र किडींनी या पिकांना नष्ट करायला आता सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचले आहेत. त्यांच्या सोबतच पाहणी करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि शेतकरी हे बांधावर आले आहेत. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, “पीक तोडू नका रे… आधीच थोडं उगवल आहे आणि आपल्या पायाने त्याचे आणखीन नुकसान करू नका” असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.