Lumpy Disease : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने घातला पुन्हा धुमाकूळ; 8 दिवसात तब्बल 11 जनावरांचा मृत्यू

Lumpy Disease : मागच्या एक महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लम्पी रोगाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. एकीकडे दुधाला नसलेल्या भाव आणि दुसरीकडे लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू यामुळे पशुपालक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. दरम्यान राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावामध्ये लम्पी रोगामुळे ११ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पशु विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

पशु विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने या आजाराचा जोरदार प्रसार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासकीय यंत्रणा तोडकी पडल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचे देखील बोलले जात आहे. राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावांमध्ये मागच्याच आठवड्यात चार दुभत्या जनावरांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर प्रशासनाने याबाबतची गंभीर धकल न घेतल्याने आणखी बारा जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जिल्हा दूध संघ गोकुळ कडून गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले मात्र या लसीकरणाचा जनावरांवर काही प्रभाव पडला नव्हता तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने याकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे अनेक पशुपालक उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. (Lumpy Disease 🙂

या ठिकाणी दिवसेंदिवस लम्पीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामध्ये विशेष करून बैल, दुभत्या गाई आणि कालवडींचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जनावर मृत्यूंची संख्या व रोग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करण्याचे गरजेचे असल्याचे शेतकरी म्हणत आहेत..

सरकारने मदत करावी

राशिवडे गाव हे राधानगरी तालुक्यातील मोठे गाव असल्याने या गावात जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना देखील आहे. मात्र या ठिकाणी यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्यामुळे पशूंवर उपचार होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बरीच जनावरे दवगावले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे आणि मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.