हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, आणि सातारा जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट तर पालघर परभणी हिंगोली नांदेड लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणात पातळीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात धरण क्षेत्रात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ६.८७ टीएमसी इतका झाला आहे. या धरणातून भोगावती नदीत १४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच सोयाबीन, तूर, कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील जलसाठा ८१ टक्के इतका झाला आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रवरा नदीत ३००० क्युसेक वेगाने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.